नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लंडन येथून साहित्य पाठविल्याची बतावणी करून या भामट्यांनी तरूणीस ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडून ३५ हजार रूपयांना गंडा घातला आहे. सोशल मीडियावर झालेली विदेशातील अनोळखी व्यक्तीची ओळखीतून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी याप्रकरणी श्रृती शुक्ला (रा.गोविंदनगर) या युवतीने तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिघूल ऑईजिन व मुजायद्दीन खान अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत.
इन्स्टाग्राम या सोशल साईडवर तरूणीची दोघा भामट्यांशी ओळख झाली होती. तिघा मध्ये वारंवार चॅटींग होत असल्याने उत्सुकतेपोटी तरूणीने विदेशातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी लंडन येथे सोन्याच्या दागिण्यांसह ब्रॅण्डेड घड्याळ ,पर्स आणि अन्य वस्तू स्व:स्तात मिळत असल्याचे सांगितले. त्यामुळे तरूणीने काही वस्तू खरेदी करण्याची अपेक्षा व्यक्त केली असता ही फसवणुक झाली.
भामट्यांनी आम्ही तुला सोन्याचे दागिणे पाठवतो अशी बतावणी करून तरूणीस ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडले. शुक्ला यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संबधीताना पैसे पाठवूनही अद्याप वस्तू मिळाल्या नाही तसेच त्यांचा संपर्क होत नसल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अहिरे करीत आहेत.