नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण, येत्या शनिवारी म्हणजेच २० मे रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तशी माहिती नाशिक महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे तुम्हाला येत्या शुक्रवारी म्हणजे उद्याच (१९ मे) पाणी भरुन ठेवावे लागणार आहे.
नाशिक महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. की वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करणे करीता विज वितरण कंपनीमार्फत शनिवार दि. २०/०५/२०२३ रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही.
तसेच मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणेत येतो, सदरचे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा दि. २०/०५/२०२३ रोजी बंद ठेवून अनु. क्र. १ व २ मधील नमुद दुरुस्ती कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा *शनिवार दि. २०/०५/२०२३ रोजीचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवार दि.२१/०५/२०२३ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल* याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे अशी विनंती अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) यांनी केली आहे.
Nashik City Water Supply Closed NMC