नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या चारही प्रवेशद्वारा नजिक ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येईल. तसेच अंबड व सिन्नर औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनलचा निर्णय १५ दिवसात घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनला दिले. त्याबाबत संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. अनेक दिवसांपासून नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनकडून नाशिक औद्योगिक वसाहतीत तसेच नाशिक शहराच्या चारही प्रवेशद्वारा जवळ ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे याबाबत पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत हे आज विविध विकासकामांबाबत नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, अमोल शेळके,विशाल पाठक यांच्यासह शिष्टमंडळाने उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देत अंबड व सिन्नर औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनलचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले. तसेच आमदार सीमा हिरे यांनी देखील याबाबत पाठपुरावा केला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका हद्दीमधील सातपूर,अंबड एमआयडीसी असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात मोठयाप्रमाणात अवजड वाहतूक होते. याठिकाणी ट्रक टर्मिनलची व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी राहतात. त्यामुळे याठिकाणी अपघातही मोठ्या प्रमाणात होतात. तसेच गाड्या उभ्या करण्यास जागा नसल्याने वाहतुकदारांना अडचण निर्माण होऊन गाड्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्यावर नाहक दंड भरावा लागत असल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे.
औद्योगिक दृष्ट्या विकसित होणाऱ्या शहरामध्ये नाशिकचा समावेश आहे. या शहरात मोठी गुंतवणूक होऊन शहराचे औद्योगिकीकरणात मोठी भर पडत आहे. शहराचे वाढते औद्योगिक वितरणामुळे व एकुणच चौफेर विकसित होणाऱ्या शहरात विशेषत: औद्योगिक परीसरात ट्रक टर्मिनल असणे हे अत्यंत आवश्यक बाब आहे. ट्रकवरील चालक व क्लीनर हे बाहेर राज्यातील आणि राज्यातील वागवेगळ्या जिल्ह्यातील व अत्यंत गरीब परीस्थितीतील असुन ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी त्यांचे राहण्याची, उपहारगृह, स्वच्छागृह, विश्रांतीगृह, वाहन दुरूस्तीसाठी गँरेज, डीझेल पंप, वजन काटा, स्पेअर पार्ट दुकान, गोडावून, सर्विस स्टेशन, अपघात कमी करण्यासाठी व नवीन नियमांचे प्रशिक्षण देण्यासाठी हॉल, प्रथमोपचारसाठी व्यवस्था असावी. अशी अनेक वर्षापासुनची मागणी प्रलबिंत आहे. नाशिक शहरातील आरक्षित ट्रक टर्मिनल विकसित झाल्यास शहरावरील वाहतुकीचा ताण तसेच वाहतुककोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे निवेदनात म्हटले आहे.
अंबड औद्योगिक परिसरात व लागत असलेल्या रहिवासी भागात ट्रक रस्त्यालगत उभे करण्याची वेळ येत असल्याने नागरिकांना व रत्याहून येजा करणाऱ्या वाहनांना खूप अडचण होत आहे काही छोटे मोठे अपघातही होतात म्हणून अंबड ट्रक टर्मिनल विकसित होणेबाबत संघटनेच्यावतीने यापुर्वी वारंवारपाठपुरावा करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत याठिकाणी ट्रकटर्मिनल उभारण्यासाठी कोणतेही सकारात्मक निर्णय झालेले नाही. यापुर्वी देखील संस्थेच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने सदरबाबत आजपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. सदर विषय गेले अनेक वर्ष प्रलबिंत आहे. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित जागेत ट्रक टर्मिनलच उभे रहावे ही संघटनेची व उद्योजकांची मागणी असून त्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात येऊन तातडीने ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे असे म्हटले आहे.
तसेच वस्तुस्थितीचा विचार करता, अंबड एमआयडीसी ट्रक टर्मिनलसाठी भुखंड विकसित करण्यात येऊन याठिकाणी ट्रक टर्मिनल उभारण्यात यावे तसेच शहराच्या इतर चार प्रवेशद्वारावर देखील ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावे याबाबत संघटना म्हणून आता पर्यंत खूप संयम ठेवून आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. सन २०१७ पासून आम्ही शासनाकडे आमची याबाबत सातत्याने मागणी असून आम्ही याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार देखील केलेला आहे. त्यामुळे वाहतूकदारांच्या हितासाठी आपण याबाबत सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा तसेच वाहतूकदारांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
Nashik City Truck Terminals Decision