नाशिक – शहरातील प्राथमिक शाळांसंदर्भात महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित केला होता. अखेर आता शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार येत्या १३ डिसेंबरपासून शहरातील पहिली ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.
कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ८वी ते १२वीचे वर्गच सुरू करण्यात आले होते. संसर्गाचे प्रमाण आणखी घटल्याने प्राथमिकचे वर्गही सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शिक्षण विभागाने १ डिसेंबरपासून राज्यात पहिली ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार राज्याच्या अनेक भागात शाळा सुरू करण्यात आला. मात्र, कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या अवताराने डोके वर काढल्याने मनपा आयुक्तांनी सावधगिरीचा इशारा दिला. येत्या १० डिसेंबर रोजी यासंदर्भातील निर्णय घेण्याचे निश्चित झाले. आज यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १३ डिसेंबरपासून शहरात पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू होत आहेत. शिक्षण विभागाने दिलेली मार्गदर्शक नियमावली पाळणे बंधनकारक असणार आहे.