नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत. तसेच, त्यात बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यातच आता वडाळागावात एक भीषण अपघात घडला आहे. त्यात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्रपाली ढेंगळे (रा. सुभाष रोड, देवळाली गाव, नाशिकरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. आम्रपाली या आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास वडाळागावातून दुचाकीने (एमएच १५ एचव्ही ५९७०) जात होत्या. त्याचवेळी एक ट्रक (केए ३२ सी ६०२४) हा ट्रकही रस्त्यावरुन जात होता. मात्र, भरधाव वेगातील या ट्रकने गॅस गोडाऊनलगतच्या परिसरात आम्रपाली यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे आम्रपाली या रस्त्यावर कोसळल्या. या भीषण अपघातात आम्रपाली यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्यासह पथक घटनास्थळी आले. त्यांनी त्वरित रुग्णवाहिका बोलावली आणि अपघातग्रस्त महिलेला रुग्णालयात रवाना केले. मात्र, तत्पूर्वीच आम्रपाली यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, या अपघातामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तसेच, काही अंशी वाहतूकही खोळंबली होती. मात्र, पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
Nashik City Road Accident women Death