नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणाऱ्या नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी एक जबर निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नाशिककरांच्या खिशावर थेट डल्लाच पडणार आहे. कारण, शहरात अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणारी टोईंग व्हॅन आता बंद करण्यात आली आहे. त्याजागी थेट ई चलान काढण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे आता ई चलानद्वारे नाशिककरांना अवैध पार्किंगचा दंड भरावा लागणार आहे. पोलिसांचा हा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
पार्किंगची सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने पार्किंग उपलब्ध करुन दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने रस्त्याच्या कडेला व अन्यत्र वाहने पार्क करावी लागतात. आणि शहराच्या वाहतुकीची जबाबदारी नाशिक पोलिसांकडे आहे. त्यामुळे अवैध पार्किंगची कारवाई पोलिसांकडून केली जाते. शहरात पुरेशी पार्किंग उपलब्ध नसताना आता पोलिसांकडून सर्रासपणे ई चलानद्वारे दंड वसुली केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला वाहने उचलेगिरी अर्थात टोईंगचा ठेका अखेरीस पोलिसांनी रद्द केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आजपासून टोइंग ऐवजी नो पार्किंगमधील वाहनांचा ई चलानद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक शहरात पार्किंगचे क्षेत्र निश्चित नाही मात्र, नो पार्किंगच्या जागेवर पार्किंग केल्यास पोलिसांची टोइंग व्हॅन येऊन वाहने उचलून नेत असल्याने नागरिकांची नाराजी होती. विशेषतः वाहने उचलताना अत्यंत घाईने आणि सामान्य नागरिकांनाच त्रास होईल अशा पद्धतीने वाहने टोइंग केल्याच्या तक्रारी होत होत्या. संपूर्ण शहराचा ठेका घेऊनसुध्दा संबंधित ठेकेदार आणि पोलिस हे शहरातील महात्मा गांधी रोड, शरणपूररोड, सीबीएस कॉलेज रोड ठराविक ठिकाणीच वाहने उचलली जात असल्याच्या तक्रारी होत्या.
पोलिस आयुक्तालयाने यापूर्वी ७ मार्च २०२२ रोजी श्रम साफल्य सर्व्हिसेस यांना वाहने टोइंग करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानुसार कार्यवाही आतापर्यंत होत असली तरी १५ मार्चपासून त्यात बदल केला असून टोइंगचा आदेशच रद्द केला आहे. मोटर वाहन कायद्याद्वारे चलान माध्यमातून दंडात्मक करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांच्या आदेशात नमूद केले आहे.
दंड भरावाच लागेल
टोईंग व्हॅन ही ठराविक भागातच फिरायची. त्यामुळे त्याठिकाणी पार्किंग करतानाही वाहनधारक सजग असायचे. आता वाहतूक पोलिस कुठल्याही भागातील अवैध पार्किंगचे ई चलान काढू शकतील. उदा. इंदिरानगर वा त्रिमूर्ती चौकात टोईंग व्हॅन फिरत नसे. त्यामुळे तेथे कारवाई होत नसे. आता मात्र, तेथेही कारवाई होऊ शकेल. त्यामुळे दिवसाकाठी शेकडो वाहनांवर दंड करणे शक्य होणार आहे. तसेच, एकदा चलान निर्माण झाले की तो दंड आज ना उद्या भरावाच लागणार आहे. म्हणजेच, या दंडापासून वाहनधारकांची कुठलीही सुटका होणार नाही.
आता कारही होणार लक्ष्य
टोईंग ठेकेदाराला चारचाकी वाहनापेक्षा दुचाकी वाहनांचे टोईंग करुन अधिक पैसे मिळत होते. त्यामुळे ठेकेदार दुचाकींना अधिक लक्ष्य करीत असे. आता पोलिसच कारवाई करणार असल्याने ते सर्वच प्रकारच्या वाहनांचे ई चलान काढू शकतील. परिणामी, यापूर्वी चारचाकी आणि तीन चाकी वाहनांवर कमी व्हायची. आता सरसकट सर्वच वाहनांवर कारवाई होणार आहे.
अनेक ठिकाणी फलकच नाही
अवैध पार्किंगची कारवाई टोईंगद्वारे करताना ज्या भागात नो पार्किंगचा बोर्ड आहे तेथेच ही कारवाई करणे अपेक्षित असते. शहरात बहुतांश ठिकाणी नो पार्किंगचे फलक नाहीत. त्यामुळे पोलिस ई चलानद्वारे दिवसाकाठी शेकडो वाहनांना दंड करणे शक्य आहे.
Nashik City Police No Parking Vehicle Action New Decision