नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्मयोगीनगर येथील आरडी सर्कल आणि तेथील काम सुरू असलेल्या जॉगिंग ट्रॅकवरील बांधकाम साहित्याची वारंवार चोरी होत आहे. या प्रकारांना त्वरित आळा घालावा, असे पत्र आर. डी. मायनिंग इक्वीपमेंट कंपनीचे संचालक राहुल देशमुख यांनी मुंबईनाका पोलिसांना दिले आहे.
कर्मयोगीनगर येथे अंबडच्या आर. डी. मायनिंग इक्वीपमेंट कंपनीने सीएसआर फंडातून काही वर्षापूर्वी आर डी सर्कल हे वाहतूक बेट विकसित केले आहे. यामुळे हा परिसर सुशोभीत झाला. या सर्कलवरील विद्युत दिवे, लोखंडी साहित्य, पाणी पुरवठ्याचे पाईप, एलईडी फोकस, लोखंडी पट्ट्या आदी साहित्याची वारंवार चोरी होत आहे. सुशोभीकरणाच्या साहित्याचीही तोडफोड केली जात आहे.
आता महापालिका याच कंपनीच्या सीएसआर फंडातून सर्कलजवळ मोकळ्या जागेत जॉगिंग ट्रॅक आणि सेल्फी पॉइंट विकसित करून घेत आहे. कंपनीचे संचालक राहुल देशमुख यांच्या संकल्पनेतून येथे काही महिन्यांपासून काम सुरू आहे. येथील बांधकाम साहित्यासह इतर साहित्याचीही वारंवार चोरी होत आहे. कंपनीने याप्रकरणी गेल्या साडेतीन वर्षात मुंबईनाका पोलिसांना वारंवार लेखी स्वरुपात कळवून तक्रार केली, तरीही चोर्यांना आळा बसत नाही. संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी आर. डी. मायनिंग कंपनीने १९ मे आणि २२ मे २०२३ रोजी मुंबईनाका पोलिसांकडे केली आहे. या तक्रार स्वरुपाच्या पत्राची प्रत त्यांनी नाशिक महापालिका आयुक्तांनाही माहितीसाठी दिली आहे.