नाशिक – भाजपाने नंदिनी नदीकाठी दोंदे पुलाजवळ लावलेले वृक्ष पाण्याअभावी सुकल्याचे लक्षात येताच शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमवारी, ५ जुलै रोजी महापालिकेच्या टँकरद्वारे या वृक्षांना पाणी दिले. यामुळे या वृक्षांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे.
उंटवाडीतील जगतापनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर आणि दोंदे पुलाच्या एका बाजूला जागतिक पर्यावरण दिनी, ५ जूनला शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली. या वृक्षांना वेळोवेळी पाणी देवून ते जगविण्यासाठीही ते प्रयत्न करीत आहेत. यानंतर भाजपाने वटपौर्णिमेला २४ जून रोजी नंदिनी नदीकाठी मोठा गाजावाजा करून वृक्षारोपण केले, त्याची होर्डिंगबाजीही केली. पावसाच्या पाण्याने वृक्ष आपोआप जगतील, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी भावना भाजपा कार्यकर्त्यांची असावी. पावसाने ओढ दिल्याने मात्र हे वृक्ष पुरते सुकले आहेत. त्यांना पाण्याची व्यवस्था करून ते जगविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी तिडकेनगर, कर्मयोगीनगर, हेडगेवारनगरच्या रहिवाशांनी केली. त्यानुसार शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. सोमवारी, ५ जुलै रोजी परिसरासह दोंदे पुलाजवळ नंदिनी नदीच्या एका काठावर भाजपाने लावलेल्या झाडांना महापालिकेच्या टँकरद्वारे पाणी दिले. भाजपाने लावलेल्या रोपट्याला शिवसेनेने तात्पुरते जीवदान दिल्याची एकच चर्चा या परिसरात रंगली आहे. वृक्ष संवर्धनाच्या या कार्याबद्दल शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचे रहिवाशांनी आभार मानले आहे.