नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन जणांनी रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नांदगावच्या बेरोजगार तरुणाला साडे सात लाख रुपयाला गंडा घातला आहे. याप्रकरणी राजकुमार मधूकर सानप (३९ रा. स्वामी विवेकानंद नगर, येवला रोड, नांदगाव) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव साहेबराव चव्हाण व त्याचा एक साथीदार (रा.दोघे जत्रा हॉटेल,आडगाव शिवार) अशी संशयित ठकबाजांची नावे असून संशयित चव्हाण व त्याच्या साथीदाराने २०१४ मध्ये सानप यांच्यासह अन्य मित्रांची भेट घेत रेल्वेतील अधिका-यांशी जवळीक असल्याचे भासवून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते.
यावेळी संशयितांनी सानप यांच्याकडून रेल्वेतील नोकरीच्या मोबदल्यात साडे सात लाख रूपयांची रोकड बँक खात्यात स्विकारली होती. अन्य मित्रांकडूनही याचप्रमाणे रकमा उकळून हा गंडा घातला आहे. तब्बल दहा वर्ष उलटूनही नोकरी न मिळाल्याने तसेच संशयित आता पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याने सानप यांनी पोलिसात धाव घेतली असून,अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.