नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकरीचे आमिष दाखवून जवळीक साधून नंतर ब्लॅकमेल करून २१ वर्षीय तरूणीस वेश्या व्यवसायास लावणाऱ्या दाम्पत्याविरुध्द पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पती पाठोपाठ आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना पाठवून पीडितेवर बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही संशयित दाम्पत्यावर फसवणुकीसह पिटाअंतर्गत गुन्हे दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुशबू सुराणा आणि परेश सुराणा असे संशयित दांम्पत्याचे नाव आहे. हिरावाडी भागात राहणा-या २१ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नोकरीच्या शोधार्थ शहरात एकट्या राहणा-या तरूणीची गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुराणा दांम्पत्याशी ओळख झाली होती. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने तरूणी व दाम्पत्याचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.
एके दिवशी या दाम्पत्याने तरूणीचे घर गाठून आपल्याला शॉपिंगला जायचे आहे असे म्हणून तरूणीस मार्केटमध्ये सोबत येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर ती तरूणी आपल्या बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. त्याचवेळी युवतीचे लक्ष नसल्याची संधी साधत संशयित व त्याच्या पत्नीने आपआपल्या मोबाईलमध्ये चोरीछुपे युवतीचे फोटो व व्हिडीओ काढले.
या घटनेस दोन दिवस उलटत नाही तोच परेश सुराणा हा मद्याच्या नशेत युवतीच्या घरी पोहचला. अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत परेशने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर परेश हा वेळोवेळी या तरुणीवर बलात्कार करत राहिला. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळ्या पुरूषांसोबत शारिरीक संबध ठेवण्यासही या तरुणीला त्याने भाग पाडले.
तब्बल दहा दिवस हा लैंगिक अत्याचार सुरू होता. संशयित दाम्पत्याचा अतिरेक वाढल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून, पोलिस सुराणा दाम्पत्याचा शोध घेत आहेत. दरम्यान संशयित सुराणा दाम्पत्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात फसवणुकीसह वेश्या व्यवसाय आणि मानवी तस्करी सारखे गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच या दाम्पत्याने एका राजकीय पदाधिकाऱ्यास बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अडकविल्याचे समजते. अधिक तपास उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.
nashik city crime Young Girl Rape Couple Booked