नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात राज्यातील चार जणांनी एका तरूणीस विदेशातील शिक्षणासाठी अॅडमिशन घेवून देतो असे सांगून तब्बल चार लाखांना गंडा घातला आहे. अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांमध्ये एका युवतीचाही समावेश आहे. हार्दिंक गांगोडे (रा.बडोदा), राजन नंदवाणी, चिंतनकुमार शिंगाला (रा.दोघे सुरत) व प्रियंका शहा अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. या अॅडमिशनासाठी ऑनलाईन रक्कम स्विकारली आहे. याप्रकरणी सिडकोतील मिरा नलिन पटेल (२६ रा. दत्तचौक) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पटेल या उच्चशिक्षीत असून त्यांना विदेशात पुढील शिक्षण घ्यायचे आहे. विदेशातील शिक्षणाचा त्या ऑनलाईन शोध घेत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून हा गंडा घातला. विदेशातील शिक्षणासाठी अॅडमिशन घेवून देतो असे सांगून या भामट्यांनी पटेल यांना त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडले.
गेल्या वर्षी २७ ऑगष्ट रोजी ही रक्कम अदा करण्यात आली. पैसे देवून आठ नऊ महिने उलटले तरी संशयितांनी अॅडमिशन करून दिले नाही. तसेच पैसेही परत केले नाही त्यामुळे तरूणीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.