नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये वेगवेगळ्य़ा भागात राहणाऱ्या दोघींवर बलात्कार तर एकीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड, उपनगर आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
घटस्फोटित महिलेवर अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळीरोड भागात राहणा-या घटस्फोटीत महिलेवर तिच्या पूर्वाश्रमिच्या पतीनेच बलात्कार केला. गणेश शाम चाफळकर (३९) असे संशयिताचे नाव आहे. २६ फेब्रुवारी रोजी मुलास भेटण्याच्या बहाण्याने संशयित महिलेच्या घरी गेला होता. यावेळी त्याने महिलेस शिवीगाळ व मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घोटेकर करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
सामनगावरोड भागात राहणा-या अमोल प्रकाश वारा (रा.अरिंगळे संकुल) याने परिसरातील तरूणीशी ओळख वाढवित प्रेमसंबध प्रस्थापित केले होते. १ डिसेंबर २०२१ ते १४ मे २०२३ दरम्यान संशयिताने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवित आपल्या राहत्या घरी व म्हसरूळ येथील विनायकनगर भागातील एका सोसायटीच्या सदनीकेत घेवून जात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. यातून युवती गर्भवती राहिल्याने तिने लग्नाचा तगादा लावला असता अमोल वारा याच्यासह वडिल प्रकाश वारा,जयश्री वारा (दोघे रा. अरिंगळे संकुल, सामनगावरोड)आणि बहिण गिता (रा. सातपूर) आदींनी पीडितेस गाठून बाळ वाढविण्यास आणि लग्नास नकार देवून तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे करीत आहेत.
भाभानगरला विनयभंग
विनयभंगाचा प्रकार भाभानगर परिसरात घडला. पीडिता सोमवारी (दि.२२) रात्री सोसायटी बाहेरील बाकावर बसलेल्या असतांना ही घटना घडली होती. रस्त्याने जाणा-या संशयिताने महिले शेजारी येवून अश्लिल हाव भाव करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.