नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात बुधवारी वेगवेगळया भागातील तीन ठिकाणी एका महिलेसह दोन मुलींचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना सह्याद्री हॉस्पिटल भागात घडली. राधेय सोसायटीत राहणा-या शिंदे नामक संशयिताने पीडितेस कामावर लावून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेत अश्लिल हावभाव करून युवतीचा विनयभंग केला.
दुसरी घटना गोविंद नगर भागात घडली. रोहित पाटील नामक संशयिताने पीडित महिलेस वारंवार मोबाईलवर फोन लावून तिला शिवीगाळ करीत विनयभंग केला. ही घटना गेल्या रविवारी (दि.२१) घडली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार सरनाईक आणि सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
तिसरी घटना औद्योगिक वसाहतीतील घडली. येथे शिवाजीनगर भागात राहणारी युवती बुधवारी परिसरातील लावण्य मेडिकल स्टोअर्स येथे गोळ्या औषधे घेण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संशयित निलेश श्रीरंग चव्हाण (३० रा. महानुभावपंथ मंदिराजवळ, शिवाजीनगर) याने पीडितेस गाठून मला तुझ्याशी मैत्री व लग्न करायचे आहे असे म्हणून माझ्यासोबत चल असा आग्रह धरला. यावेळी तरूणीने त्यास नकार दिला असता संशयिताने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सरनाईक करीत आहेत.