नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काठे गल्लीत एका बांधकाम व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी तब्बल ८ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या घरफोडीत चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. आनंद हिरे असे तक्रारदार बिल्डरचे नाव आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिस कसून चोराचा तपास करत आहेत.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, हिरे यांच्या घरातील सर्व सदस्य काठे गल्लीतील टाकळी रोडवरील लॉन्स- मध्ये सुरू असलेल्या भागवत कथेसाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री पावणेआठच्या सुमारास हिरे यांच्या पत्नी घरी परतल्या. त्यावेळी घराच्या लोखंडी जाळ्या कापलेल्या आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ पती आनंद हिरे यांना माहिती दिली.
दोघांनी घरात आत जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील सोन्याचे दागिने, मोत्याची बांगडी यांसह सहा लाखांची रोकड असा सुमारे ८ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता सुमारे २५ ते ३० वर्षीय दोन संशयित तोंडास रुमाल बांधून घरात जाताना व बाहेर पडताना आढळून आले. त्यांच्या हातात गज तोडण्याचे तसेच कुलुप तोडण्याचे हत्यार दिसून आले. या चोरीबाबत भद्रकाली पोलिसांना माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
nashik city crime theft robbery builder home
kathe galli bungalow