नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वितरणासाठी दिलेल्या आयफोनच्या बॉक्समधील तब्बल चार लाख रूपये किमतीचे मोबाईल कामगारानेच लंपास केल्याची घटना घडली आहे. बळीराम रावजी खोकले (रा. धामणगाव, ता.इगतपुरी) असे मोबाईल लांबविणा-या संशयित कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विश्वास घाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश ज्ञानेश्वर पाटील (रा. बोधलेनगर, टागोरनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील यांची थत्तेनगर भागातील प्रथमेश अपार्टमेट मध्ये कुरिअर एजन्सी आहे. या एजन्सीत खोकले कार्यरत होता. तो मालाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळायचा.
२२ मार्च रोजी इंस्टा कार्ड सर्व्हीसेस या कंपनीची डिलेवरीचे काम एजन्सीकडे आले होते. संशयिताने शहरातील आयफोन वितरकांकडे मोबाईल पोहचविण्यासाठी बॉक्स नेले असता ही घटना घडली. वेगवेगळ्या बॉक्समधून सुमारे ३ लाख ९१ हजार १३३ रूपये किमतीचे पाच अॅपल कंपनीचे फोन खोकले याने परस्पर लांबविले. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.