नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूरनाका भागात अचानक बस थांबविल्याच्या कारणातून ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी चालकास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी लासलगाव येथील निवृत्ती संग्राम फड या बसचालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फड गुरूवारी (दि.८) एस.टी. महामंडळाच्या एमएच १४ बीटी ४५०६ या बसवर सेवा बजावत होते. दुपारी औरंगाबाद रोडने आलेली बस चालक फड यांनी नांदूरनाका परिसरात प्रवासी उतरविण्यासाठी थांबविली असता ही घटना घडली.
त्याचवेळी पाठीमागून मोपेड दुचाकीवर तीन जण आले. येथे बस का थांबविली, अशी विचारणा या अज्ञात तिघांनी केली. याच कारणातून वाद घालत त्यांनी शिवीगाळ केली. यावेळी चालक कॅबीनमध्ये चढून संशयितांनी फड यांना मारहाण केली. अधिक तपास हवालदार ठापसे करीत आहेत.