नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर परिसरात चोरीच्या घटना नित्याच्याच आहेत. मात्र, आता चोरट्यांनी जे दिसेल ते लांबवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. जयभवानी रोडवर दोन गायी चोरट्यांनी लांबवल्या. तर, औरंगाबादरोडवर लॉन्सच्या किचनमधून अल्युमिनीअम पातेल्याच्या झाकणासह गॅस टाकीची चोरी झाली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन गायींची चोरी
जयभवानीरोड भागातील जेतवननगर भागात बांधलेल्या दोन गायी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता नाना आवारे (रा.झेव्हीअर्स शाळेच्या बाजूला, जेतवननगर जयभवानीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आवारे यांच्या मालकिच्या सुमारे ३० हजार रूपये किमतीच्या दोन गायी बुधवारी (दि.२४) त्यांच्या घरासमोर बांधलेल्या असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांना सोडून पळवून नेल्या. अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.
अल्युमिनीअम पातेल्याच्या झाकणासह गॅस टाकी लांबवली
औरंगाबादरोड परिसरात लॉन्समधील किचन मधून चोरट्यांनी अल्युमिनीअम पातेल्याच्या झाकणासह भरलेली गॅस टाकी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम नामदेव गायकवाड (रा.गौतमनगर,उपनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
गायकवाड औरंगाबादरोडवरील संभाजीनगर येथे असलेल्या धनलक्ष्मी लॉन्सचे कामकाज बघतात. मंगळवारी (दि.२३) रात्री धनलक्ष्मी लॉन्स मध्ये विवाह सोहळ््यांची धामधुम सुरू असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी लॉन्समधील किचनची जाळी तोडून अल्युमिनीअम पातेल्याचे झाकण आणि भरलेले गॅस सिलेंडर टाकी असा सुमारे १५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.