नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडी भागात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळय़ातील सुमारे ९० हजाराचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मंगळवारी घडली.
याप्रकरणी उषा विवेक मुंदडा (५५ रा. तुलसी सोसा.सरस्वतीनगर) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंदडा या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. राहत्या परिसरातच त्या रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. सरस्वतीनगर येथील शहा यांच्या बंगल्यासमोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजाराचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
लॉन्समध्ये जेवत असताना पर्स लांबवली
भारतनगर भागात लॉन्स मध्ये जेवन करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्समध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ७१ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी माया अशोक खोडवे (३६ रा.आम्रपालीनगर, कॅनलरोड, जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खोडवे या रविवारी (दि.२१) सायंकाळी नातेवाईकांच्या लग्नानिमित्त वडाळारोड भागात आल्या होत्या. मन्नत लॉन्स मध्ये विवाह आटोपून त्या जेवन करीत असतांना ही घटना घडली. जेवत असतांना शेजारील खुर्चीवर ठेवलेली त्यांची पर्स चोरट्यांनी चोरून नेली. या पर्स मध्ये रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ७० हजार ८०० रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.