नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इयत्ता बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. तर, शहरातील वेगवेगळ्या भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत अंबड, आडगाव आणि गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. अन्य दोघांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. कृष्णाली अनिल साबळे (१८, रा. लोटस आशीर्वाद पार्क, वृंदावननगर, कामटवाडे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. कृष्णाली ही बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. गुरुवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला. कमी गुण मिळाल्याने कृष्णालीने घरातच विषारी औषध सेवन केले. काही वेळाने तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबियांनी तिला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कृष्णालीच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील ध्रुवनगर भागात घडली. हेमंत रघुनाथ रूले (३८ रा.महालक्ष्मी गार्डन,निलय बंगल्यापुढे ध्रुवनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. हेमंत रूले यांनी शुक्रवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राजू सुतार यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.
दुस-या घटनेत मच्छींद्र धोंडू पाटील (७० रा.मारूती मंदिराजवळ माडसांगवी) या वृध्दाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये सिमेंट पत्र्याच्या लोखंडी पाईपाला स्कॅ्रप बॅण्डेजची पट्टी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बापू कड यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.