नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावरील आंबेडकरनगर भागात अर्ध्या वाटेत दमदाटी करीत उतरून देत रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने एका प्रवासी वृध्दास लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी नरेंद्र यशवंत जाधव (६१ रा. मंगलवाडी,जुना गंगापूरनाका) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत संशयितांनी केलेल्या धक्काबुक्कीत जखमी झालेल्या जाधव यांनी कसेबसे घर गाठून आपबिती कथन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेवून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मोईन मेहबुब पठाण (२१ रा.नानावली,भद्रकाली) व शंकर उर्फ पावळया गोविंद गावीत (१९ रा.गंगाघाट झोपडपट्टी,पंचवटी) असे वृध्दास लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराचे नाव आहे.
या घटनेत धक्काबुक्की करीत भामट्यांनी सोन्याचे दागिणे, मोबाईल व रोकड बळजबरी काढून घेत पोबारा केला होता. जाधव गेल्या १ मे रोजी बाहेरगावाहून शहरात परतले असता ही घटना घडली. मध्यरात्री आपल्या घरी जाण्यासाठी ते सीबीएस परिसरातील सपट चहा दुकानाजवळ थांबलेले असतांना पाठीमागे एक प्रवासी बसवून आलेल्या अॅटोरिक्षात ते बसले होते. जाधव रिक्षात बसताच चालकाने आपले वाहन द्वारकाच्या दिशेने दामटले.
यावेळी पाठीमागे बसलेल्या युवकाने त्यांना दमदाटी व धक्काबुक्की करीत गप्प बसण्यास सांगून जे असेल ते काढून देणााचे फर्मान सोडले. नाशिक पुणे रोडने धावत्या रिक्षात भेदरलेल्या जाधव यांनी खिशातील रोकडसह मोबाईल आणि हातातील अंगठी असा सुमारे ६० हजार २०० रूपये किमतीचा ऐवज संबधीच्या स्वाधिन केला. यानंतर आंबेडकरनगर परिसरात चालकाने निर्जनस्थळी वाटेत सोडून देत दोघांनी पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
नाशिकरोडला वृद्धाचे सव्वा दोन लाख लांबवले
नाशिकरोड भागात बँकेतून पैसे काढून रिक्षाने प्रवास करणा-या वृध्देच्या पर्समधील सव्वा दोन लाख रुपये सहप्रवाशाने लंपास केले. या चोरीप्रकरणी नंदा मनोहर तुपे (६३ रा.जयाभाई कॉलनी,नाशिकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुपे या गुरूवारी (दि.११) सकाळच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्रच्या नाशिकरोड शाखेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. २ लाख १३ हजाराची रोकड घेवून त्या घराकडे निघाल्या असता ही घटना घडली. अॅटोरिक्षातून त्या परतीचा प्रवास करीत असतांना रिक्षातील अज्ञात भामट्या प्रवाश्याने तुपे यांचे लक्ष नसल्याची संधी साधत पर्सची चैन उघडून रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास सविता उंडे करीत आहेत.