नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील सुर्या हॉटेल परिसरातील सर्व्हीसरोडवर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ४२ वर्षीय पादचारी ठार झाला. विकास भाईदास पाटील (४२ रा.मंगेशी ग्रीन सिटी, आधारवाडी, जेलरोड कल्याण वेस्ट) असे अपघात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पाटील गुरूवारी (दि.१८) नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले असता ही घटना घडली. इंदिरानगर बोगदा भागातील सुर्या हॉटेल समोर सर्व्हीस रोड ते ओलांडत असतांना मुंबईकडे भरधाव वेगात जाणा-या अज्ञात चारचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात पाटील यांचा मृत्यू झाला. अधिक तपास जमादार माळी करीत आहेत.
नाशिकरोडला तलवारीचा धाक दाखवणारा गजाआड
नाशिकरोडला शिवाजी पुतळा भागात तलवारीचा धाक दाखवत दहशत माजविणा-या तरूणास पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रदिप आबा चव्हाण (२० रा.माऊलीनगर,सामनगावरोड) असे अटक केलेल्या तलवारधारीचे नाव आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. संशयिताच्या ताब्यातून तलवार हस्तगत करण्यात आली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड येथील उड्डाणपूलाखालील शिवाजीपुतळा भागात एक तरूण तलवारीचा धाक दाखवित दहशत माजवित असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१८) पथकाने धाव घेत सार्वजनिक सुलभ शौचालय भागात संशयितास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत लोखंडी तलवार मिळून आली असून, याप्रकरणी कर्मचारी शंकर काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.