मेडिकल स्टोअर्स चालविण्यासाठी ठेवलेल्या फार्मसिस्टने डॅाक्टरला घातला पाच लाखाला गंडा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोड भागात डॅाक्टरला मेडिकल स्टोअर्स चालविण्यासाठी ठेवलेल्या फार्मसिस्टने पाच लाखाला गंडा घातला आहे. रविश विजयकुमार कोहली (५३ रा.जाणताराजा कॉलनी,मखमलाबाद रोड) असे डॉक्टरला गंडा घालणा-या फार्मसिस्टचे नाव आहे. याप्रकरणी डॉ.प्रणव विजय देवरे (रा.हनुमाननगर) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. देवरे यांचा गंगापूररोड भागात दवाखाना असून याच परिसरातील गजानन प्लाझा या इमारत भागात त्यांचे मेडिकल स्टोअर्सही आहे. मेडिकल स्टोअर्स सांभाळण्यासाठी त्यांनी संशयिताची फार्मसिस्ट म्हणून नेमणुक केली होती. संशयित विश्वासू असल्याने डॉ. देवरे यांनी गेल्या महिन्यात संशयिताच्या ताब्यात औषध खरेदी करण्यासाठी चार लाख रूपये स्वाधिन केले होते. मात्र संशयिताने औषधांची खरेदी केली नाही तसेच दुकानातील सुमारे एक लाख रूपयांच्या औषधांचाही अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.
२२ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २२ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना कामटवाडा भागात घडली. मुकूंद संजय दळवी (रा.साई विहार अपा.अभियंता नगर) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. दळवी याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकूंद दळवी याने सोमवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात छताच्या पंख्याच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत हितेश सावंत यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.