नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील आडगाव येथे ट्रकला वेल्डिंगचे काम करतांना अचानक ट्रकला आग लागल्यामुळे ट्रक जळून खाक झाला तर वेल्डिंग करणारा गंभीररित्या भाजल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे मोठा भडका उडाल्यामुळे आजूबाजूला असणारे नागरिक भयभीत झाले होते. या आगीने रौद्ररूप धारण केले होते. पण, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. वेल्डिंग करण्यापूर्वी ट्रकच्या बॅटरीची वायर काढण्याचा वेल्डिंग काम करणाऱ्याला विसर पडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेत वेल्डिंग करणा-याचे हात पाय भाजले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.