नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑरगॅनिक खत व अन्य शेतीची उत्पादनांची निर्मीती करणा-या रिचगलेब फर्टिलायझर प्रा.लि. च्या मालकाला सेल्सव्यवस्थापकाने १९ लाखाचा गंडा घातला आहे. विजय काशिनाथ भरणे (रा.गोतोंडी जि.पुणे) असे संशयित सेल्सव्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी हर्षल संजय गावंडे (रा.कमोद पेट्रोल पंपामागे,औरंगाबादरोड) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाच्या मोबदल्यात ग्राहकांकडून घेतलेल्या रकमा सेल्सव्यवस्थापकाने परस्पर लांबविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी समजलेली माहिती अशी की, गावंडे यांची रिचगलेब फर्टिलायझर प्रा.लि. नावाची कंपनी असून त्यात ऑरगॅनिक खत व अन्य शेतीची उत्पादनांची निर्मीती केली जाते. या कंपनीचे राज्यभर ग्राहक असल्याने माल पोहचविण्यासह आर्थिक वसूलीसाठी संशयित व्यवस्थापकाची नेमणुक करण्यात आली होती. ऑगष्ट २०१९ पासून संशयित या कंपनीत कार्यरत होता. प्रारंभी सहा महिने त्याने प्रामाणिक काम करीत मालकांचा विश्वास संपादन केला. या काळात त्याने आपल्या गावीही फर्टिलायझरचे दुकान टाकले. त्यासाठी त्याने कंपनीकडून साडे आठ लाख रूपयांचा माल उचलला. या मालाच्या रकमेची परतफेड न करता संशयिताने इंदापूर, बारामती व अन्य ठिकाणच्या डिलर्स आणि वितरकांकडून सुमारे ९ लाख ६४ हजार रूपयांची वसूली केली. तब्बल १८ लाख १२ हजार ७९५ रूपयांची रक्कम संशयिताने कंपनीस अदा न करता परस्पर अपहार केला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.