नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोत बिअरची बाटली दिली नाही या कारणातून टोळक्याने हॉटेल मालक असलेल्या पितापुत्रांवर हल्ला करुन डोक्यात बिअरच्या बाटली डोक्यात फोडली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहे. याप्रक्रणी अशोक गोविंदराव काच्छेला (रा.होलाराम कॉलनी,शरणपूररोड) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशिक अडांगळे, गणेश खांदवे व त्यांचे सात ते आठ साथीदार अशी हॉटेल मालकांवर हल्ला करणा-या संशयिताची नावे आहेत. काच्छेला यांचा सिडकोतील सुरेश प्लाझा या इमारतीत मैफिल बिअर बार अॅण्ड रेस्टॉरंट आहे. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कांच्छेला व त्यांची निखील आणि यश हे दोन्ही मुले आपला व्यवसाय वाढवून घराकडे निघत असतांना ही घटना घडली. दोन्ही मुले हॉटेल बंद करीत असतांना काच्छेला बार बाहेर उभे होते. यावेळी प्रशिक अडांगळे व गणेश खांदवे हे दोघे संशयित तेथे आले व त्यांनी काच्छेला यांच्याकडे बिअरची बाटली मागितली. काच्छेला यांनी बार बंद झाल्याचे सांगून बिअर देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त दोघांनी शिवीगाळ करीत बिअर दिली नाही तर जीवे मारू अशी धमकी देत काच्छेला यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरडाओरड ऐकून काच्छला यांची दोन्ही मुले आपल्या वडिलांच्या मदतीला धावून आले असता संशयितांनी त्यांच्या अन्य साथीदारांना बोलावून घेत बापलेकांना बेदम मारहाण केली. या घटनेत चन्या व सन्या नामक तरूणांनी तुम्हाला खूप माज आला आहे असे म्हणत बाजूला पडलेल्या रिकाम्या बिअर बाटल्या उचलून जीवे मारण्याच्या उद्देशाने बापलेकांच्या डोक्यावर फोडल्या तर अन्य तरूणांनी जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत माजवित दगड फेक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत.