नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील दत्तमंदिर चौक भागातील स्मशानभूमीत मागील भांडणाची कुरापत काढून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रूतीक रक्ताटे व त्याचा एक साथीदार अशी मारहाण करणा-या संशयित दुकलीचे नाव आहे. याप्रकरणी रमाकांत अंबादास सोनवणे (४९ रा.नम्रता चौक.पाटीलनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने रमाकांत सोनवणे जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे शनिवारी आपल्या घर परिसरातील अमरधाम भागात गेले असता ही घटना घडली. त्रिमुर्तीचौक येथील दत्तमंदिर स्मशान भूमिभागात दोघा संशयितांनी त्यांना गाठले. यावेळी दोघांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत रक्ताटे याने हातातील धारदार शस्त्राने सोनवणे यांच्या डोक्यात वार केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत.