नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खंडणीसह १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी जयेश उर्फ जया हिरामण दिवे याला पोलिसांनी गजाआड केले आहे. दिवे याला म्हसरुळ आडगाव लिंकरोडवरील म्हाडा बिल्डींग समोरुन ताब्यात घेण्यात आले आहे. जयेश उर्फ जया हिरामण दिवे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन तो गुन्हा घडल्या पासून पसार होता.
भाजपा पदाधिका-याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयितासह त्याच्यासाथीदारांवर खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. घटनेपासून तो पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत असतांना युनिटचे अंमलदार विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहिम राबविण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. त्यानुसार पोलिस यंत्रणा गुन्हेगारांचा माग काढत असतांना देवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ च्या पथकाने म्हसरूळ आडगाव लिंकरोडवरील वरील म्हाडा बिल्डींग भागात बुधवारी (दि.१८) पथकाने सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळ््यात अडकला. म्हाडा बिल्डींग समोर तो दाखल होताच पोलिसांनी झडप घालून त्यास जेरबंद केले. संशयितावर चौदाहून अधिक गंभीर गुन्हे आहेत. संशयितास अंबड विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई अंमलदार प्रविण वाघमारे,प्रदिप म्हसदे,आसिफ तांबोळी,नाझिम पठाण,प्रशांत मरकड,विशाल देवरे व महेश साळुंके आदींच्या पथकाने केली.