नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील साईग्राम नगर भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी लंपास केले. याप्रकरणी पल्लवी आकाश उकार्डे (रा.सिम्बॉयसेस कॉलेज समोर,उपेंद्रनगर) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उकार्डे व त्यांच्या नणंद रोहिणी उकार्डे या दोघी बुधवारी (दि.१८) परिसरातील टेलरच्या दुकानात कपडे टाकण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. दोघी नणंद भावजयी साईग्राम नगर येथील गणेश रोहाऊस समोरून पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी भावजयीच्या पाठीवर थाप मारून गळय़ातील सुमारे ६२ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.