नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतनगर भागात धारदार तलवारीसह गुप्ती घेवून परिसरात दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड करुन संशयितांच्या ताब्यातील शस्त्र हस्तगत केले. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजान नईम शेख (१९) व सचिन भारत इंगोले (२८ रा.दोघे मोंहम्मदभाई किरणा गल्ली नासर्डी नदी जवळ) अशी संशयितांची नावे आहेत. दोघे संशयित बुधवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास परिसरात आपली दहशत कायम राहवी यासाठी हातात धारदार तलवार व गुप्ती घेवून लोकांना दमदाटी करीत होते. याबाबतची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाल्याने पथकाने घटनास्थळी जावून दोघांना जेरबंद केले. संशयितांच्या ताब्यातील तलवार आणि गुप्ती जप्त करण्यात आली असून संशयितांसह मुद्देमाल मुंबईनाका पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. याप्रकरणी युनिटचे कर्मचारी मुक्तार शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.