नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॅनाल मध्ये दुचाकीसह पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मखमलाबाद शिवारातील गंगापूर रोडवर घडली आहे. ज्ञानेश्वर साहेबराव कराड (४०) हे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ज्ञानेश्वर कराड हे गुरुवारी घरी न आल्यामुळे त्यांच्या आई लंकाबाई साहेबराव कराड यांनी लहान मुलगा दिपक यास फोन करून सांगितले. त्यानंतर दिपकने मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने शोध घेत घेतला असता त्यांना ज्ञानेश्वर हा दुचाकीसह गायकवाड मळ्यासमोरील पाटात पडलेला आढळून आला. या अपघातात ज्ञानेश्वरच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे आढळून आले. त्यानंतर या घटनेची माहिती दिपकने म्हसरूळ पोलिसांना दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.