नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नारायण बापूनगर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरावरील पत्रे उडाले तर आईसह तीन मुले या स्फोटात गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी पत्र्याची चाळीतील सुगंधा सोळंकी यांच्या घरी घडली. सुगंधा सोळंकी मुलांना शाळेत जायचे असल्याने त्यांना चहापाणी व जेवणाचा डबा तयार करून देण्याच्या कामात असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडाले. तर सुगंधा सोळंकी या ५० टक्के भाजल्या तर त्यांची मुले रुद्र (वय ५) हा १५ टक्के तर आर्यन व सूर्या ही दोन मुले पाच टक्के भाजली आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. यातील जखमींना बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.