विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळी विरुध्द उपनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत महिलेचा भाऊ प्रणय प्रभाकर दाणी (रा.नारायणबापूनगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रशांत प्रल्हाद भालेराव, प्रल्हाद किसन भालेराव, आशा प्रल्हाद भालेराव,आशिष प्रल्हाद भालेराव व जाऊ निकीता आशिष भालेराव (रा.सर्व रमाबाई आंबेडकर कॉलनी,घाटकोपर मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दाणी यांची बहिण प्रणाली प्रशांत भालेराव (२९) यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. संशयितांच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप दाणी यांनी केला आहे. ३१ जानेवारी २०२१ ते आजतगायत संशयितांनी मानसिक, शारिरीक व आर्थिक छळ करून बहिणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
दोन जणांची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी रविवारी आत्महत्या केली. पहिली घटना चेतनानगर भागात घडली. प्रणव महेश निकम (२० रा. सौमिया रेसि.एकमुखी दत्तमंदिराजवळ) या युवकाने रविवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास बेडसिट बांधून गळफास लावून घेतला होता. बेशुध्द अवस्थेत कुटूंबियांनी त्यास तात्साख सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.रोशन चौधरी यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत. दुसरी घटना महालक्ष्मीनगर येथे घडली. येथील दयाराम शिवराम जगताप (३८ रा.सचित रो हाऊस,महालक्ष्मीनगर) यांनी रविवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शेजारी नियाज शेख यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.