नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हवेत गोळीबार करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन संशयितांविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म अॅक्ट व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल चोरमारे (३५ रा.राणेनगर),जग्गू सांगळे व राज जोशी अशी संशयितांची नावे आहेत. वापरण्यास घेतलेली कार परत करण्यास गेलेल्या पाच जणांवर कारमालकाने बंदूक रोखत हवेत गोळीबार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अविनाश विक्रम टिळे (२७ रा.धात्रकफाटा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. टिळे यांनी चोरमारे यांची कार एमएच ०१ बीजी ५८८१ वापरण्यासाठी घेतली होती. बुधवारी (दि.४) रात्री टिळे आपला मित्र विनोद गोसावी,यश शिंदे,भुषण देशमुख व युवराज सोनवणे आदींना सोबत घेवून इंदिरानगर बोगद्यासमोरील साईनाथ चौफुली भागात गेले असता ही घटना घडली. सी.के मोटार गॅरेज समोर उभ्या असलेल्या कारमालक चोरमारे व अन्य दोघांनी टिळे यांच्यासह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली. यावेळी चोरमारे याने बंदूकीतून हवेत गोळीबार करून तुम्हाला आता जीवंतच सोडत नाही अशी धमकी दिली. यावेळी चोरमारे याने टिळे यांच्या अंगावर धावून जात व त्यांच्या दिशेने बंदूक रोखत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सूरी करीत आहेत.