नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावकाराकडून घेतलेल्या पैसे व्याजासह देऊनही जास्त पैशाची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी देणा-या सावकाराविरुध्द मुंबई नाका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेत पाच टक्के व्याज दराने नऊ लाख रुपये तक्रारदाराने घेतले. त्या बदल्यात त्याने ५० लाख रुपये दिले. पण, त्यानंतरही २० लाखांची मागणी होत असल्याचे समोर आले आहे. हे पैसे दिले नाही तर वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्यामुळे सुरेश पोराला पुजारी (रा. श्रीराम चौक, राजीवनगर, राणेनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलिसांनी सावकाराविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पुजारी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पाच टक्के व्याज दराने नऊ लाख रुपये घेतले होते. २००७ पासून ते २०२२ पर्यंत या रकमेच्या व्याजापोटी ४४ लाख ९० हजार रुपये रोखीने देण्यात आले. उर्वरीत रक्कमेचे सहा लाख रुपये सावकाराच्या सांगण्यावरून आरटीजीएसने पुजारी यांचे खाते असलेल्या भारत को – ऑप बँकेतून महावीर राजेंद्रकुमार यांचे खाते असलेल्या शरणपुररोड शाखा अॅक्सिस बँक खात्यात ट्रान्सफर केले होते. असे एकुण ५० लाख ९० हजार रुपये घेतले. हे पैसे दिल्यानंतरही सावकार वीस लाखांची मागणी करुन वारंवार फोन करून शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक चंद्रकांत आहिरे अधिक तपास करत आहेत.