नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिसिप्ट आली नाही अशी बतावणी करीत एटीएम कार्डची आदला बदल करुन महिलेच्या पतीच्या बँक खात्यातील ४६ हजार लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुफेदीबाई रामराज मिना (रा.नेहरूनगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिना या शनिवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास भिमनगर येथील एटीएम बुथमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. अरण्येश्वर अपार्टमेंट येथील एचडीएफसी बँकेच्या बुथमध्ये त्या गेल्या होत्या. पतीचे एटीएम कार्ड टाकून त्या पैसे काढत असतांना पाठीमागून आलेल्या दोघांनी आमची रिसीप्ट आली नाही अशी बतावणी करीत मिना यांना एटीएम मशिनमध्ये पुन्हा कार्ड टाकण्यास भाग पाडले. यानंतर भामट्यांनी हातचलाखीने कार्डची आदला बदल करीत पतीच्या बँक खात्यातील ४६ हजाराच्या रोकडवर डल्ला मारला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.