नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. या आत्महत्येत एका महिलेचा समावेश असून तिने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. तर दुस-या घटनेत ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना हिरावाडीत घडली. मनिषा सचिन बिचुकले (३९ रा.नेहानिचा सोसा.मोकळबाबा नगर) या महिलेने रविवारी (दि.१) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच मुलगा अर्जुन याने त्यांना तातडीने आडगाव नाका भागातील सदगुरू हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.क्रिष्णा यादव यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत. दुसरी घटना देवळाली गावात घडली. येथील नितीन विष्णू मोरे (३५ रा.फडवळचाळ,पाटील गॅरेज जवळ) यांनी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील गच्चीत असलेल्या झोका टांगण्याच्या बिमला गोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब रविवारी (दि.१) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत ओमकार घोडे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.