नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जयभवानी रोड भागात मुलीस शिकवणीस सोडून घराकडे परतणा-या महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूणा नवनाथ चिंधे (रा.जाचक मळा,जयभवानीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चिंधे या शनिवारी (दि.३१) सायंकाळी मुलगी भाग्यश्री हिस शिकवणीसाठी परिसरातील क्लासमध्ये गेल्या होत्या. मुलीस सोडून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. घराजवळील आाकाशा सोसायटीसमोरून त्या पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून पॅशन दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळय़ातील सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.