नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे रोडवरील नासर्डी पुल जवळ प्रवासी वाहतूक करणा-या वाहनचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत दुचाकीस्वारांनी रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनेत जखमी चालकाच्या खिशातील दोन हजार ६०० रूपयांची रोकड बळजबरी काढून भामट्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी गणपत ज्ञानोबा माळी (रा.वाल्हेकरवाडी,चिंचवड पुणे) या वाहनचालकाने तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळी पुणे येथील साईकृपा ट्रव्हल्स कंपनीत चालक पदावर कार्यरत असून गुरूवारी (दि.२९) ते चिंचवड येथील रामनगर भागातील प्रवासी घेवून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी जात असतांना ही घटना घडली. टेम्पो ट्रव्हल्स एमएच १४ एचयू ०७९६ या वाहनातून ते नाशिक पुणे मार्गाने प्रवास करीत असतांना शहरातील नासर्डी पुल परिसरातील समाज कल्याण कार्यालयासमोर पाठीमागून डॉन अशी नंबर प्लेट असलेल्या पल्सरवरून आलेल्या त्रिकुटाने त्यांचे वाहन अडविले. यावेळी चालक माळी यांनी आपल्या वाहनाचा दरवाजा उघडला असता संशयितांपैकी एकाने शिवीगाळ करीत थेट त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर,मनगटावर व पंजावर वार करण्यात आल्याने ते जखमी झाले असून चालक जखमी झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी त्यांच्या खिशातील २ हजार ६०० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत व पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला परत जाऊ देणार नाही अशी धमकी देत भामट्यांनी पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.