नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडी भागात परिचीताने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी समर्थ तुषार परदेशी (२० रा.भिमसिंग निवास,शक्तीनगर हिरावाडी रोड) या तरुणास अटक केली आहे.
अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित व मुलीचे कुटुंबिय एकमेकांचे परिचीत आहेत. मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती संशयिताला मिळाल्याने त्याने मुलीशी संपर्क साधला होता. प्रेमप्रकरणामुळे तुझे वडिल नेहमी ताणतणावात राहत असल्याची बतावणी त्याने केली होती. वडिलांशी आपले चांगले संबध असल्याने त्यावर मार्ग काढू शकतो असा सल्लाही त्याने दिला होता. त्यामुळे मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. वडिलांची मनधरणी करण्याबरोबरच यातून मार्ग काढण्यासाठी व सल्ला घेण्यासाठी मुलगी मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास हिरावाडीतील शक्तीनगर भागात असलेल्या एका सोसायटीच्या दुस-या माळ्यावरील सदनिकेत गेली असता ही घटना घडली.
संशयिताने बोलाविल्याने मुलगी सदर ठिकाणी गेली असता संशयिताने तिला वडिलांची भिती दाखवत ते ताणतणावात राहत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने वडिलांचे बरे वाईट होण्याची शक्यता वर्तविल्याने भेदरलेल्या व मधुमियाने त्रस्त असलेल्या मुलीस अस्वस्थ वाटू लागले. ही संधी साधत संशयिताने मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. कसेबसे घर गाठून मुलीने आपबिती आपल्या पालकांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोहित केदार करीत आहेत.