नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथरवट लेन भागात मद्यपानास पैसे दिले नाही या कारणातून परिचीताने तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या एक युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केतन अशोक थोरात (२८ रा.शिवकृपानगर पंचवटी) या युवकाने तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश शेलार (रा.नागचौक,पंचवटी) असे चाकू हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. थोरात मंगळवारी (दि.२७) रात्री मित्र विनायक लाटे यास भेटण्यासाठी पाथरवटलेन भागात गेला होता. मारूती मंदिरासमोरून तो जात असतांना संशयित परिचीताने त्यास गाठले. यावेळी संशयिताने मला दारू पाज असा आग्रह धरला मात्र थोरात याने त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संशयिताने थोरात यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त संशयिताने थांब तुझा मुडदाच पाडतो अशी धमकी देत थेट चाकू हल्ला केला. या घटनेत थोरात याच्या कमरेवर हाताच्या कोपरावर चाकूने सपासप वार करण्यात आले असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.