नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक रोड येथील काजळे ज्वेलर्समध्ये पहाटे झालेल्या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. बिटको सिग्नल जवळ महावितरण समोर असलेल्या जलधारा बिल्डिंग मध्ये असलेल्या या ज्वेलर्समध्ये ही चोरी करण्यात आली. सकाळी पेपर टाकणाऱ्या मुलाला ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी काजळे ज्वेलर्सचे मालक सुनील काजळे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर सुनील काजळे आपल्या मुलासोबत दुकानाजवळ आले. त्यांनी सर्व पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आले. यानंतर त्यांनी उपनगर पोलिसांना ही सर्व माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले असून सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईंकर मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.
चोरी अशी झाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद चोरट्यांनी सर्वप्रथम दुकानाच्या बाहेरील दोन्ही सीसीटीव्ही तोडले. सीसीटीव्ही तोडल्यानंतर त्यांनी कटरने ग्रील तोडून शटर वाकवले. त्यानंतर दुकानात प्रवेश करुन त्यांनी दुकानाचे मेन लाईट कनेक्शन कट केले. अवघ्या १५ मिनिटात चोरी करून हे चोर सोबत असलेल्या मारुती इको या गाडीत बसून फरार झाले. चोरट्यांनी लाईट कनेक्शन कट केले पण दुकानातील इन्व्हर्टर चालू असल्यामुळे चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.