नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडीयावरील मैत्रीतून दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे नाशिकमध्ये दाखल झाले आहे. पहिल्या घटनेप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या घटनेप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटीसह विनयभंग आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत दिल्लीस्थीत प्रियकराने विवाहीतेचे घर गाठून मारहाण केल्याने हे प्रकार पोलिसात पोहचले आहेत. या महिलेचे विवस्त्र आणि अश्लिल व्हिडीओ आणि छायाचित्र संशयिताने तिच्या पतीसह नातेवाईकांच्या सोशल साईडवर टाकून बदनामी केली आहे. दुस-या घटनेत एका आदिवासी महिलेस इन्स्टाग्राम वरील मित्राने थेट शरिरसंबधास उत्तेजीत केल्याचे प्रकार समोर आला आहे.
पहिली घटना गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत घडली. विवाहीत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार दिल्लीस्थित तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता व संशयितांमध्ये प्रेमसंबध होते. या प्रेमप्रकरणात दोघांमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला जात होता. याकाळात संशयिताने महिलेचे विवस्त्र फोटो आणि व्हिडीओ काढले होते. गेल्या नऊ महिन्यांच्या काळात संशयिताने ब्लॅकमेल करीत महिलेकडून पैसे व दागिणे घेतले. संशयिताची मागणी वाढल्याने महिलेने टाळाटाळ केली असता संशयिताने जुलै महिन्यात महिलेचे घर गाठून तिला मारहाण केली. तसेच अंगावरील दागिणे काढून घेत त्याने फोन पे च्या माध्यमातून बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारला असून यावेळी झालेल्या झटापटीत महिलेचा आयफोन फोडला आहे. पीडितेने विरोध केल्याने संशयिताने महिलेच्या पतीसह नातेवाईकांच्या सोशल साईटवर तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ टाकून बदनामी केली. ही बाब समोर येताच महिलेने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंगासह आयटी अॅक्ट आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेडकर करीत आहेत.
दुस-या घटनेत आडगाव शिवारात राहणा-या पीडितेने तक्रार दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची शहरातील संशयिताशी ओळख झाली होती. इन्स्टॉग्राम या सोशल साईडवरून झालेल्या या मैत्रीत दोघांमध्ये नेहमीच चॅटीग सुरू होती. वेगवगळे फोटो आणि व्हिडीओ टाकून एकमेकांचे मनोरंजन होत असतांनाच संशयिताने महिलेशी अश्लिल स्वरूपाचे मॅसेज पाठून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यास कुठलाही जाब न विचारता त्याकडे दुर्लक्ष केल्याने संशयिताने गैरअर्थ काढत व जातीवाचक शिवीगाळ करून महिलेस ५ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान अश्लिल संवाद साधत शरिरसंबध ठेवण्यासाठी त्याने महिलेस उत्तेजीत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेने संपर्क तोडूनही संशयिताचा अतिरेक वाढल्याने तिने पोलीसात धाव घेतली असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटीसह विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे करीत आहेत.