नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शहरात चक्कर येवून पडल्याने दोन जणांचा शहरातील वेगवेगळ्या भागात शुक्रवारी मृत्यू झाला. त्यात ६५ वर्षीय व्यक्तीसह ७० वर्षीय वृध्देचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना तारवालानगर भागात घडली. अलका अशोक कस्तुरे (७० रा.कृष्णा हाईटस सोसा.लोखंडे मळा दिंडोरीरोड) या शुक्रवारी आपल्या राहते घरात अचानक चक्कर येवून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास दुखापत झाल्याने मुलगा अमोल कस्तूरे यांनी तात्काळ औरंगाबादनाका येथील अपोलो रूग्णालयात दाखल केले असता डॉ.प्रविण जाधव यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक मालसाने करीत आहेत. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. येथील बाळू सुखदेव साळवे (६५ रा.इंद्रप्रस्त सोसा.त्रिवेणी पार्क ) हे शुक्रवारी सकाळच्या सुमारास शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. परिसरातील मॉडेल कॉलनीतून ते फेरफटका मारत असतांना अचानक चक्कर येवून पडले होते. मुलगा सचिन साळवे यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.









