नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील अमरधाम भागात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेस गाठून दोघांनी मारझोड करीत हा विनयभंग केला. या संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. ३४ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरूवारी (दि.१५) पीडिता नेहमीप्रमाणे अमरधाम भागातील शंकराच्या मंदिरात गेली होती. देवदर्शन आटोपून ती घराकडे परतत असतांना ही घटना घडली. निर्जन वाटेने महिला पायी जात असतांना समोरून आलेल्या दोघा तरूणांनी तिला अडवून हे कृत्य केले. महिले शेजारी येवून एकाने तिच्या डोक्यात बुक्का मारला तर दुस-याने तोंड दाबून विनयभंग केला. भेदरलेल्या महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरड करून वेळीच प्रतिकार केल्याने भामटे पसार झाले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोहित केदार करीत आहेत.