नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधाराश्रमातील मुलींवरील अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. म्हसरुळ मधील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातील चौकशीला या पथकाने सुरुवात केली आहे. दरम्यान, या आधाराश्रम बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी हर्षल मोरे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातील संचालाकानेच अल्पवयीन १३ मुलींचा विनयभंग आणि ७ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी संचालकाला अटक करत घटनेचा तपास सुरु केला. तपासात मोरे याने ७ मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात आरोपी हर्षल मोरेवर पोक्सो आणि अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पोलीस तपास सुरु असून न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आता या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. बालहक्क संरक्षण आयोगाचे पथक नाशिकमध्ये हजर झाले असून याप्रकरणाची सखोल चौकशी हे पथक करणार आहे. या द्विसदस्यीय पथकाने आज आश्रम शाळेची पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. केंद्रीय पथकासोबत राज्य महिला व बाल विकास आयोगाचेही सदस्य आहेत.