नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात आंघोळीसाठी तळयावर गेलेल्या अल्पवयीन मुलावर दोघा मित्रांनीच अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली. या घटनेची वाच्यता करू नये यासाठी पीडितास दगड आणि ब्लेड मारून जखमी केले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित अल्पवयीन मुलगा मंगळवारी (दि.२९) सकाळी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. रस्त्याने पायी जात असतांना वाटेत त्याचे दोन अल्पवयीन मित्र भेटले. तिघे जण परिसरातील जंगल भागात असलेल्या तळयावर आंघोळीसाठी गेले असता ही घटना घडली. पाण्यात डुबकी मारून निघालेल्या दोघा मित्रांनी बालकावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी बालकाने घरी जावून नाव सांगेल अशी धमकी दिल्याने संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड मारून व गळ्याजवळ ब्लेड मारून त्यास जखमी केल्याने ही घटना उघडकीस आली. बालकाने घरी येवून आपल्या आईकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर पालकांच्या स्वाधिन केले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.
………