नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी नुकतीच गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात महिलेसह ३२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंबड औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात राहणाºया कृष्णा पांडूरंग लोखंडे (३२ रा. घरकुल योजना,चुंचाळे) यांनी शनिवारी (दि.५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडिल पांडूरंग लोखंडे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना चांदगिरी ता.जि.नाशिक येथे घडली. मुक्ता भावदास हांडगे (३५ रा.इनाम मळा,चांदगिरी) या महिलेने रविवारी (दि.६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात आड्याच्या लोखंडी बारला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत लखन कटाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.