नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरयू पार्क नं. १ भागात खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या भामट्या ग्राहकाने व्यावसायिक महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत ओरबाडून नेल्याची घटना घडली. मिनाक्षी दिनकर ठानगे (रा.पल्लवी रो हाऊस शेजारी,शरयू पार्क नं.१) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठानगे यांचे आपल्या घरातच किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या आपल्या दुकानात असतांना ही घटना घडली. होण्डा शाईन दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एक जण दुकानात पेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. ठानगे या त्यास विविध प्रकारचे पेन दाखवित असतांना संशयितांने त्यांच्या गळय़ातील सुमारे २० हजार रूपये किमतीची पोत ओरबाडून दुचाकीवर पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.