नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आत्याच्या मुलाशी विवाह करावा यासाठी महिलेला २० ते २२ दिवस डांबून बापलेकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने उपनगर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये पीडितेची आत्या, तिचा पती आणि आतेभावाचा समावेश आहे.
गेल्या २२ फेब्रुवारी रोजी पीडिता आपल्या घरात एकटी असतांना ही घटना घडली. चारचाकीतून आलेल्या संशयितांनी चाकूचा धाक दाखवून तसेच तोंड ताबून पीडितेच्या घरातील ५० हजार रूपयांची रोकड आणि महत्वाचे कागदपत्र बळजबरीने काढून घेतले. यानंतर महिलेस सेवली ता.जि. जालना येथे या संशयितांच्या मुळगावी चारचाकीतून पळवून नेण्यात आले. या ठिकाणी डांबून ठेवत पीडितेवर १८ मार्च पर्यंत संशयित दोघा बापलेकाने वेळोवेळी बलात्कार केला. तर आत्याने आपल्या मुलाशी लग्न कर नाही तर जीवे ठार मारेन अशी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच चार दिवस उपाशी पोटी ठेवून घरात डांबून ठेवले. महिलेने सुटका करून नाशिक गाठले. यानंतर पीडितेने पोलिसांचे उंबरठे झिजवले. मात्र दाद न मिळाल्याने तिने न्यायालयात धाव घेतली होती. पीडितेचा पुर्नविवाह झाला असून ती नाशिकला उपनगरला रहाते. आता न्यायालयाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भालेराव करीत आहेत.