भरधाव स्कुटी दुभाजकाला धडकून झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार तरूणी ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकात भरधाव स्कुटी दुभाजकाला धडकून झाडावर आदळल्याने दुचाकीस्वार तरूणी ठार झाली. रूचिका राजेश बोराडे (२३ रा. श्रीधर कॉलनी,पंचवटी) असे मृत युवतीचे नाव आहे. रुचिका आपल्या मैत्रीणीसमवेत कंपनीत कामावर जात होती. या अपघातात मैत्रीणही जखमी झाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चालक तरूणीविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूचिका बोराडे आणि रेश्मा सतिष बोराडे (रा.मखमलाबाद) या दोघी मैत्रीणी सातपूर औद्योगीक वसाहतीतील विनीजीन कंपनीत कामास होत्या. शुक्रवारी सकाळच्या सुमारास दोघी मैत्रीणी एमएच १५ ईक्यू ९५५३ या स्कुटीवरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकातून दोघी मैत्रीणी प्रवास करीत असतांना चालक युवतीचा आपल्या भरधाव स्कुटीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. स्कुटी दुभाजकाला धडकून त्यातील झाडावर आदळली. या अपघातात दोघी मैत्रीणी जखमी झाल्या होत्या. त्यातील रूचिका बोराडे हिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर चालक रेश्मा बोराडे या हेल्मेट मुळे बालंबाल बचावल्या असून त्यानाही दुखापत झाली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.
भरधाव दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडनेर गेट ते देवळाली कॅम्प दरम्यान भरधाव दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. रमिश रहेमान शेख (३० रा.कॅन्टोमेंट बोर्ड क्वार्टर,गुरूद्वारारोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख शुक्रवारी (दि.१६) दुपारी वडनेर गेटकडून देवळाली कॅम्पच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून प्रवास करीत होते. स्वस्त धान्य दुकानासमोर भरधाव दुचाकीवरून पडलेल्या अवस्थेत ते मिळून आले. मित्र अयुब शेख यांनी तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. मनिषा होनराव यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.